जय महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनी अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते व जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मोठे विधान करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. "उद्धव साहेबांना हिऱ्यासारखी माणसं सांभाळता आली नाहीत, हे दुर्दैव आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
"हिऱ्यासारखी माणसं सांभाळता आली नाहीत" – अर्जुन खोतकर
राजन साळवी यांच्या शिंदे गटात प्रवेशावर प्रतिक्रिया देताना अर्जुन खोतकर म्हणाले, "उद्धव साहेबांना सोडून जाण्याचा प्रश्न नाही. त्यांनी विचारधारा बदलली आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यांच्यानंतर कमान उद्धव ठाकरे यांच्या हातात आली होती. पण त्यांनी हिऱ्यासारखी माणसं सांभाळली नाहीत, हे दुर्दैव आहे."
खोतकर पुढे म्हणाले, "उद्धव साहेबांना सोडताना आम्हाला देखील दुःख झाले होते. मी असो किंवा एकनाथ शिंदे असोत, आम्ही आनंदाने शिवसेना सोडली नव्हती. आम्हाला वेदना झाल्या, पण पक्षातील बदलांमुळे हा निर्णय घ्यावा लागला."
शिवसेनेत शिंदे गटाची मजबुती
अर्जुन खोतकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वाढत्या ताकदीवरही भाष्य केले. ते म्हणाले, "शिवसेनेत एक चांगली गोष्ट घडली आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे. साहजिकच, ज्यांनी पारंपरिक शिवसेनेत वर्षानुवर्षे काम केले आहे, त्यांना हे कठीण जाणवणारच."
आदित्य ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टिप्पणी
आदित्य ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल बोलताना खोतकर म्हणाले, "आता सूचना देऊन काय उपयोग? पाणी वाहून गेले आहे. डॅमेज कंट्रोलच्या बाहेर परिस्थिती गेली आहे. आता काही होणार नाही. आदित्य ठाकरे यांनी स्वतःच आता ‘ज्यांना जायचे ते जावे’ असे सांगितले आहे. याचा अर्थ त्यांच्या हातातून सर्व काही निसटले आहे."
स्नेहभोजनावर स्पष्टीकरण
शिवसेना उबाठाचे काही नेते भाजप आयोजित स्नेहभोजनाला गेल्याच्या चर्चांवर खोतकर म्हणाले, "संसदेत किंवा विधिमंडळात अशा प्रकारचे स्नेहभोजन कार्यक्रम नेहमीच होतात. आमंत्रण मिळाल्यावर कोणीही जाऊ शकते. त्यामुळे यावरून अनावश्यक चर्चा नको."
राजन साळवी यांचा शिंदे गटात प्रवेश हा शिवसेनेच्या सध्याच्या राजकीय समीकरणात महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अर्जुन खोतकरांनी केलेल्या टीकेमुळे उद्धव ठाकरे यांची यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.